बंद

    परिचय

    प्रकाशित तारीख : June 15, 2023

    आमचे ध्येय

    वाहतुक सुरळीत आणि सुरक्षित ठेवण्यासाठीची सर्वोच्च मानके साध्य करणे. अपघातांना प्रतिबंध व त्यांचे प्रमाण कमी करणे. वाहतूक नियमांची प्रभावी अंमलबजावणी करणे. रस्ता वापरणाऱ्यांमध्ये शिस्तीची भावना निर्माण करणे, शाळकरी मुलांसह नागरिकांना रस्ता सुरक्षेबद्दल शिक्षण देणे. लोकांच्या आवश्यकता व गरजांना प्राधान्याने प्रतिसाद देवून त्या कुशलता व संवेदनशीलतापूर्वक हाताळणे. महत्वाचे प्रसंगी आणि व्हीव्हीआयपी कर्तव्यांचे वेळी सर्वसामान्य लोकांची कमीत कमी गैरसोय होईल यासाठी वाहतूक सुरळीत व सुरक्षित राहील हे सुनिश्चित करणे. अत्यावश्यक परिस्थितीत लोकांना मदत व अपघातग्रस्तांना त्वरित प्रथमोपचार, इ. सेवा प्राधान्याने पुरविणे. वाहतूक पोलिसांची मानव संसाधने विकसित करणे. विविध गैर सरकारी संस्था व प्राधिकरणांना वाहतूक सुरळीत व सुरक्षित ठेवण्यासाठी तसेच पायाभूत सुविधांच्या विकासासाठी मदत आणि सल्ला देणे. पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी ध्वनी आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी योग्य पावले उचलणे. वाहतूक व्यवस्थापनांमध्ये जनतेच्या सक्रीय सहभागास प्रोत्साहन देणे. नागरिकांशी सुसंवाद साधणे जेणेकरुन त्यांच्या सहकार्याने सर्व सामाजिक उद्दिष्टे साध्य करता येतील.

    मुंबई वाहतूक पोलीस (एम.टी.पी)

    मुंबई वाहतूक पोलिस हा मुंबई पोलिसाचा अविभाज्य घटक आहे, सध्या मुंबई वाहतूक पोलिसांचे नेतृत्व श्री. प्रविण पडवळ (भा.पो.से.), पोलीस सह आयुक्त, वाहतूक, बृहन्मुंबई यांच्याकडे आहे. सुमारे साडे तीन हजारांहून अधिक पोलिस अधिकारी व पोलिस अंमलदार हे मुंबईतील नागरिकांना शक्य तितकी चांगली पोलिस सेवा देण्यासाठी सदैव तत्परतेने काम करत आहेत.

    सर्व जागतिक शहरांतील वाहतूक पोलिसांसाठी सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे रहदारीचा प्रवाह सुरळीत राखणे असते. त्याचबरोबर नागरिकांच्या सुरक्षेचा सुध्दा विचार करून वाहतुकीचा प्रवाह सुधारणे हे सुध्दा मुंबई वाहतूक पोलिसांचे प्राथमिक उद्देश आहे.

    मुंबई वाहतूक पोलिसांचे मुख्यालय वरळी येथे आहे व प्रशिक्षण केंद्र भायखळा येथे आहे. वाहतूक पोलीस जनतेस मार्गदर्शन करण्यात, वाहतूक नियंत्रित करण्यात, देखरेख करण्यात व्यस्त आहेत ज्यामुळे नागरिकांना त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचता येते.

    ई चलान, ‘मुंबई वाहतूक पोलिस ॲप, एम.टी.पी हेल्पलाइन, व्टिटर, व्हॉट्स ॲप, एम.टी.पी सीसीटीव्ही चलन,एम.टी.पी ॲप, एम.टी.पी व्ही.एम. एस, एम.टी.पी एस.एम.सी, इत्यादी प्रणालींचा दैनंदिन व्यवहारात प्रभावी वापर करणारे मुंबई वाहतूक पोलिस हे अग्रेसर आहे. मुंबई वाहतूक पोलीस विभाग हे बहुआयामी व उच्च स्तरीय विशेषतापुर्ण शिक्षण आणि प्रशिक्षण देणारे जागतिक स्तरावरील अग्रगण्य वाहतूक व्यवस्थापन केंद्र आहे.

    मुंबई वाहतूक पोलीस हे सांस्कृतिक वारसा जतन करणारी आणि प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करणारा अखिल भारतातील अत्याधुनिक पोलीस विभाग असुन सर्व नागरिकांसाठी ही अभिमानाची बाब आहे.

    जसे कायदे हे शिस्तबद्ध व सुरक्षित प्रवासासाठी आहेत तर दंड (तडजोड रक्कम) हे प्रतिबंधात्मक उपाय आहेत.

    तुमच्या क्षेत्रातील वाहतूक पोलिसांबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी, तुमच्या जवळचे वाहतूक विभाग येथे भेट द्या.

    जीवन अनमोल आहे!